इंजिनीअरिंग प्रवेशाची प्रक्रिया नियमबाह्य ; शैक्षणिक संस्थांवर प्रशासक नेमावा - कल्पेश यादव

मुंबई : सीईटी सेलच्या माध्यमातून इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, लॉ अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांची संस्थास्तरावरील; तसेच मॅनेजमेंट कोट्याची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत नियमावली देण्यात आली आहे. सीईटीने प्रदर्शित केलेल्या पुस्तिकेतील मार्गदर्शक सुचनेनुसार नियम १३ (a ते j) प्रमाणे शैक्षणिक संस्थांनी संस्था स्तरावरील प्रवेश करणे आवश्यक आहे. मात्र, राज्यातील नामांकित व्यावसायिक शिक्षण संस्था नियम दाबून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात असल्याचे समोर आले आहे याबाबत युवा सेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण संचालनालय आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाला लक्ष घालण्याची विनंती केल्याचे यादव यांनी सांगितले.

इंजिनीअरिंग प्रवेशाची प्रक्रिया नियमबाह्य ; शैक्षणिक संस्थांवर प्रशासक नेमावा - कल्पेश यादव

पुण्यातील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या संस्थेने नियम डावलून संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबवल्याचे पुरावे सीईटी सेलकडे सादर केले होते. त्यावर आयुक्त सरदेसाई यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाला पत्र पाठवून संबंधित प्रवेशाची चौकशी करण्याचे सुचित केले होते. मात्र, केवळ पीआयसीटी या शैक्षणिक संस्थेनेच नाही तर पुण्या- मुंबईसह इतरही नामांकित शैक्षणिक संस्थांनी नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. त्या संदर्भातील पुरावे आपणाकडे सादर करत आहे. हे पुरावे पाहता संबंधित संस्थांनी राबवलेली प्रवेश प्रक्रिया नियम धाब्यावर बसून केल्याचे सिद्ध होते. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे या शैक्षणिक संस्थांचे प्रवेश रद्द करून संबंधित प्रवेशासाठी प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी कल्पेश यादव यांनी आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे केली आहे.

तिसऱ्या कॅप राऊंडनंतर नियमाप्रमाणे कॅप फेऱ्यानंतर रिक्त जागा ; तसेच मॅनेजमेंट कोटामधील जागांकरीता प्रवेश प्रक्रिया राबविताना सीईटीने प्रदर्शित केलेल्या पुस्तिकेतील मार्गदर्शक सुचनेनुसार नियम १३ (a ते j) प्रमाणे कॅप राऊंड नंतर रिक्त जागा आणि मॅनेजमेंट कोटातील जागांची माहिती वेबसाइटवर प्रदर्शित करुन, दिलेल्या मुदतीत जागांकरीता प्रवेश अर्ज मागविण्यासाठी ऑनलाईन सुविधा आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील. तदनंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट प्रदर्शित करणे. प्रदर्शित केलेल्या प्रोव्हिजनल मेरीट मध्ये काही हरकती असतील. तर त्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देणे.त्यानंतर फायनल मेरील लिस्ट जाहीर करणे. जाहिर केलेल्या मेरीट लिस्ट नुसार स्पाॅट राऊंड घेत मेरीट लिस्टनुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे, या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पुर्ण करणे अपेक्षित आहे. परंत, तंत्रशिक्षण संचालनालयाने महाविद्यालयांना नोटीसा व समज देऊन सुध्दा काही महाविद्यालयांनी नोटीसीला केराची टोपली दाखविलेली आहे.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, आकुर्डीसह खाली नमुद केलेल्या महाविद्यालय/शैक्षणिक संस्थानी कॅप राऊंडनंतर होणारे कॅपनंतर रिक्त जागा ; तसेच संस्था स्तरावरील जागांकरीता प्रवेश प्रक्रिया राबविताना रिक्त जागांची माहिती न देता फक्त कॅपनंतर रिक्त राहणारी जागाकरीताच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्यामुळे मॅनेजमेंट कोट्याच्या जागाकरीता महाविद्यालयांशी आर्थिक व्यवहार प्रस्थापित केलेल्या विद्यार्थ्यांचाच प्रवेश होणार असल्याची शक्यता आहे.

ताजे उदाहरण

डी.वाय.पाटील आकूर्डी संस्थेकडून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या कालावधीमध्ये ऑफलाइन अर्ज भरून घेण्यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध झाले. हे अर्ज केवळ त्यांच्याच शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध असतील असेही जाहीर केले. प्रत्यक्षात या संस्थेने ऑनलाइन पद्धतीने फॉर्म स्वीकारणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध जागा घोषित करणे सुद्धा बंधनकारक आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीने अर्ज न स्वीकारता केवळ विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून डोनेशनच्या नावाखाली स्वतःची तुंबडी भरण्यासाठी नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून ज्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी लाखो रुपये घेतले आहेत, अशाच विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संस्था प्रवेश देणार आहेत. 

प्रवेश तत्काळ रद्द करावे

पुण्यातील इतरही शैक्षणिक संस्थांनी नियम धाब्यावर बसून केवळ संस्था स्तरावरीलच नाही, तर कॅप राऊंडनंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. विद्यार्थी व पालकांना किती जागा शिल्लक आहेत, या संदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध न करून देता प्रवेशातून नफेखोरीचा धंदा सुरू केला. युवासेनेतर्फे यापूर्वी सुद्धा आपल्या निदर्शनास पुण्यातील शैक्षणिक संस्थांकडून राबविल्या जात असलेल्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया संदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच प्रशासकाच्या नियंत्रणाखाली हे प्रवेश करावावेत, अशी मागणी करण्यात आली. मात्र, तंत्र शिक्षण विभागाने नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवत केवळ संबंधित शैक्षणिक संस्थांकडून खुलासा मागविला आहे. शैक्षणिक संस्थांकडून राबविल्या जात असलेल्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आपणास सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित संस्थांची प्रवेश प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

युवासेनेकडून मागोवा

गेल्यावर्षी सुद्धा युवासेनेने शैक्षणिक संस्थांकडून राबविल्या जात असलेल्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेची तक्रार आपल्याकडे केली होती. केवळ चौकशी समिती स्थापन करून आपण नियमबाह्य प्रवेशाला अभय देण्याचे काम केले. कारण संबंधित समितीचा अहवाल अद्याप आपण प्रसिद्ध केला नाही. तसेच नियम डावलून प्रवेश करणाऱ्या संस्थांवरही कारवाई केली नाही. त्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकाऱ्यांनाच राज्यातील व पुण्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये नियमबाह्य प्रवेश घडवून आणायचे आहेत की काय ? असा संशय घेण्यास जागा आहे. आपणाकडे खालील शैक्षणिक संस्थांची नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रवेशाची माहिती सादर करत आहे.

नियमबाह्य पद्धतीने प्रवेश राबविलेल्या पुण्यातील शैक्षणिक संस्थांची नावे खालील प्रमाणे :

१)डी. वाय. पाटील इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज, आकुर्डी

२)डी. वाय. पाटील इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज, पिंपरी

३)कमिन्स इंजीनिअरिंग कॉलेज कोथरूड,

४)भारती विद्यापीठ काॅलेच ऑफ इंजीनिअरिंग फाॅर वुमन पुणे

५)इंदिरा इंजीनिअरिंग ॲंड मॅनेजमेंट कॉलेज

६)पुणे विद्यार्थी गृह इंजीनिअरिंग कॉलेज

७)अजिंक्य डी. वाय. पाटील इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज लोहगाव

८) मॉर्डन इंजीनिअरिंग कॉलेज

९) मराठवाडा इंजीनिअरिंग कॉलेज, कर्वे रोड

१०) मराठवाडा इंजीनिअरिंग कॉलेज, लोहगाव