पाटील प्रकरणात परबांचा पेन ड्राइव्ह बॉम्ब
परिवहन आयुक्तालयातील मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्यावर विविध आरोप करण्यात आले असून त्याबाबत विधिमंडळाच्याअधिवेशनातही चर्चा झाली. याबाबत प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या वृत्त मालिकेचा भाग दुसरा.
सचिन पाटील प्रकरण: पेन ड्राइव्हच्या पुराव्यांवरही अद्याप कारवाई नाही
पुणे, प्रतिनिधी
माजी परिवहन मंत्री व आमदार अनिल परब यांनी परिवहन आयुक्तांना दिलेल्या पेन ड्राइव्हमधील पुराव्यांवरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सवाल वाढला आहे. परब यांनी असा दावा केला आहे की, या पेन ड्राइव्हमध्ये मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्याविरोधात गंभीर पुरावे आहेत.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी माध्यमांना सांगितले होते की, हा पेन ड्राइव्ह विजिलेंस विभागाला तपासासाठी सुपूर्द केला गेला आहे. मात्र, दीड महिना उलटूनही कोणतीही प्रगती न झाल्यामुळे प्रश्न उपस्थित झाला आहे की, पुरावे असूनही कारवाई का थांबली आहे?
सचिन पाटील यांच्यावर वाहन तपासणी, ‘ओव्हरलोड’ ट्रकवर कारवाई न करणे आणि आर्थिक गैरव्यवहार यासारख्या अनेक तक्रारी आहेत. या प्रकरणाची विधिमंडळ अधिवेशनातही दखल घेण्यात आली होती. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही.
सामाजिक संघटना आणि नागरीक यांना आता या प्रकरणावरून शंका निर्माण झाली असून, “पेन ड्राइव्हमधील पुराव्यांवरही का कारवाई होत नाही?” हा सवाल उघडपणे विचारला जात आहे.