डीटीईचा पीआयसीटी कॉलेजला दणका
नियमबाह्य पद्धतीने केलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश; निरीक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू होणार का ? इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाची नियमबाह्य पद्धतीने इन्स्टिट्युशनल; तसेच मॅनेजमेंट कोट्याची प्रवेश प्रक्रिया राबविल्या प्रकरणी तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीला (पीआयसीटी) झटका दिला असून, संबंधित प्रवेश रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सीईटी सेलच्या इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश फेऱ्या (कॅप) संपण्यापूर्वीच इन्स्टिट्युशनल कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्यास, ते तत्काळ रद्द करावे. त्याचप्रमाणे सीईटी सेलच्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आदेश डीटीईचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांनी दिले आहेत.
'पीआयसीटी'सह पुणे-पिंपरी चिंचवडमधील १० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांनी 'सीईटी सेल'कडून राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियांच्या फेऱ्या संपण्यापूर्वीच (कॅप राऊंड) इन्स्टिट्युशनल; तसेच मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश सुरू केले आहे. हे प्रवेश करण्यासाठी नियम १३ नुसार कार्यवाही करण्याचे अपेक्षित असतांना, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असल्याची तक्रार युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे तक्रार केली होती. यादव यांनी प्रवेशांबाबत पुरावेही जोडले होते. याबाबत सरदेसाई यांनी परिपत्रक प्रसिद्ध करीत, डीटीईच्या संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांना 'पीआयसीटी'बाबत कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार पुणे विभागीय सहसंचालक डॉ. जाधव यांनी पीआयसीटीच्या संचालकांना पत्र पाठवत आदेश दिले आहेत.
इन्स्टिट्युशनल कोट्यातून प्रवेशासाठी ८ ऑगस्टला प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. या वेळापत्रकात ३१ ऑगस्टला प्रवेशाची अंतिम गुणवत्ता प्रसिद्ध केली असून, प्रवेश घेण्यासाठी ३ ते ५ सप्टेंबर मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत प्रवेश केले असल्यास, ते तत्काळ रद्द करावे. सीईटी सेलने इन्स्टिट्युशनल कोट्यासाठी सांगितलेल्या नियमाप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी. या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल डीटीईकडे सादर करण्याचे आदेश डॉ. जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे 'पीआयसीटी'ला पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागेल. डीटीईने अनेक दिवसांनी एखाद्या महाविद्यालयावर कारवाई करण्याबाबत पावले उचलली आहे.
....
इंजिनीअरिंग कॉलेजांवर निरीक्षक नेमण्याची आवश्यकता
.....
'पीआय़सीटी'प्रमाणेच आणखी काही इंजिनीअरिंग कॉलेज नियमबाह्य पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवित आहे. केवळ एका कॉलेजवर कारवाई करून साध्य होणार नाही. अशावेळी या कॉलेजांवर कारवाई करण्यासोबतच, त्यांच्यावर डीटीईकडून निरीक्षक नेमण्यात यावा. तेव्हाच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. त्याचप्रमाणे चौकशी समितीद्वारे संपूर्ण प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी युवासेनेचे राज्याचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.
.....
प्रवेशाचा नियम १३ काय सांगतो ?
.....
- कॅप राउंडनंतर रिक्त राहणाऱ्या; तसेच मॅनेजमेंट जागांची माहिती जाहिरातीद्वारे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे.
- रिक्त जागांची नोटीस फलकावर किंवा वेबसाइटवर प्रसिद्ध करणे.
- रिक्त जागांवर प्रवेशासाठी अर्ज मागविणे.
- अर्जांनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार प्रवेशाची यादी प्रसिद्ध करणे.
- यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देणे.
-