विद्यार्थ्यांचे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी द्या
युवासेना सहसचिव कल्पेश यादव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे मागणी पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे पीआरएन (परमनंट रजिस्ट्रेशन नंबर) ब्लॉक झाल्यामुळे त्यांना त्यांच्या अर्धवट राहिलेले पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करता येत नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्ग काढत पीआरए नंबर ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी द्यावी अशी मागणी युवा सेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी सत्र पूर्तता कालावधीत पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्यांचे पीआरएन क्रमांक ब्लॉक केले आहेत. मागील वर्षी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करून पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे हजारो विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले आणि त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या. यावर्षी सुद्धा पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पीआरएन क्रमांक ब्लॉक झाल्यामुळे परीक्षा अर्ज भरू शकत नाहीत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार ठराविक कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, याबाबत विद्यार्थ्यांना विद्यापीठ किंवा महाविद्यालयाकडून कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रथम व द्वितीय वर्षात उत्तीर्ण झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचे केवळ शेवटचे वर्ष राहिले आहे. तर इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी प्रथम द्वितीय व तृतीय वर्षात उत्तीर्ण आहेत. महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी प्रवेशही दिला आहे. परंतु, आता त्यांना परीक्षा अर्ज भरता येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांना याबाबत कल्पना असतील तर त्यांनी मर्यादित कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली असती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने व विद्यापीठ प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम एक सलग वर्षात पूर्ण करण्याचे बंधन नाही. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार टप्प्याटप्प्याने परीक्षा देऊन पदवी प्राप्त करू शकतात. नवीन शैक्षणिक धोरणात जर ही तरतूद केली असेल तर यापूर्वी काही कारणांमुळे परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून देता येऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे विद्यापीठ प्रशासनाने व परीक्षा विभागाने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत तर त्यांच्यावर मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होईल. परीक्षा न देऊ शकल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांवर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी वाढणार आहे. सध्या शिक्षण महागडे होत चालले आहे. शासनाकडून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला तरच महाराष्ट्रात या तरुणांना शिक्षण घेऊन रोजगार उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा युवासेनेतर्फे विद्यापीठ प्रशासना विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा कल्पेश यादव यांनी पुणे विद्यापीठाला दिला आहे.