धक्कादायक.! पुण्यात पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला
हडपसर जवळील ससाणेनगर भागातील घटना वर्दीतील सहाय्यक पोलिस निरीक्षकावर हल्ला करणाऱ्या दोघांची ओळख पटली
भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकावर दोन सराइत गुन्हेगारांनी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर येथील सससाणेनगर परिसरात घडली. रत्नदिप गायकवाड असे गंभीर जखमी झालेल्या सहायक निरीक्षकाचे नाव असून, ते महमंदवाडी पोलिस चौकी येथे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चारच्या सुमारास गायकवाड ससाणेनगर रेल्वे फाटकापासून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी सराइत गुन्हेगार निहाल सिंग मन्नू सिंग टाक आणि एका अनोळखी व्यक्तीत वाद सुरू होता. निहाल सिंग आणि राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९) ते समोरील व्यक्तींना मारहाण करीत होते. तसेच, त्यांच्याकडे कोयता होता. हे पाहून सहायक निरीक्षक गायकवाड यांनी त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी निहालसिंग मन्नू सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता गायकवाड यांना फेकून मारला. तो कोयता गायकवाड यांच्या कपाळावर लागला असून, गंभीर जखम झाली आहे. त्यानंतर हल्लेखोर सय्यदनगरच्या दिशेने पळून गेले. निहाल सिंग मन्नू सिंग टाक (वय २०) आणि राहुलसिंग या दोघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
.................