पुणे शहरातील सीएनजी गॅसच्या दरात वाढ; नवीन दर लागू
पुणे शहरातील सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) गॅसच्या दरात वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार
पुणे: स्वच्छ इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तुलनेने स्वस्त असणाऱ्या सीएनजी गॅसदरात वाढ करण्यात आली आहे. रविवार (दि.८) मध्यरात्रीपासून शहरात सीएनजी दरात प्रति किलो ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार शहरात आता सीएनजी ८५. ९० रुपये किलोने मिळणार आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच सीएनजी दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ करण्यात आली होती.
दोन महिन्यांत अडीच रुपयांची वाढ
पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याने नागरिक सीएनजी वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र, सीएनजीच्या दरात देखील सातत्याने वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच सीएनजीच्या दरात प्रति किलो दीड रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ९० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच मागील दोन महिन्यात जवळपास अडीच रुपयांनी सीएनजी वाढला आहे.
सीएनजी वाहनचालकांना फटका
शहरात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे तीन लाखांवर आहे. यात चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर रिक्षा, पीएमपीएल बसेससह अन्य वाहनांचा समावेश आहे. यामुळे अशा वाहनचालकांना याचा फटका बसणार असून वाढीव दराने गॅस खरेदी करावा लागणार आहे.
----------------