दुर्दैवी.! कारच्या ड्रायव्हिंग सीटवरच डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका

आज दुपारी पुण्यातील वानवडी येथे एक चारचाकी गाडी सुरू होती. त्यामधील व्यक्ती बेशुद्धावस्थेत होती. म्हणून नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात त्यांना नेले. दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले.

दुर्दैवी.! कारच्या ड्रायव्हिंग सीटवरच डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका

पुणे: वानवडी भागातुन चारचाकीने जात असताना तरुण डॉक्टरचा आज दुपारी चारचाकी गाडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे २:३० च्या सुमारास परमार पार्क सोसायटीसमोर उभी असलेली एक चारचाकी गाडी सुरू अवस्थेत आढळून आली. गाडी थांबलेली आहे गाडीतील व्यक्तीही आतमध्ये आहे मात्र, गाडी सुरू असल्याने, नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला ससून रुग्णालयात नेले.

ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर, डॉक्टरांनी तपासणी करून त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत व्यक्तीचे नाव अनुप रॉय असल्याचे गाडीत सापडलेल्या ओळखपत्रांवरून स्पष्ट झाले. अनुप रॉय हे एक तरुण डॉक्टर होते आणि त्यांना चार-पाच वर्षांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

अनुप रॉय हे साहिल प्राईड सोसायटी, कामठे पाटील नगर, येवलेवाडी येथे राहत होते. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात चांगला अनुभव होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीत उच्च रक्तदाबामुळे काही समस्याही होत्या, ज्या त्यांना मागील काही वर्षांपासून भेडसावत होत्या. या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या डॉ. अनुप रॉय यांचा अचानक मृत्यू हे अनेकांसाठी धक्का देणारे आहे.