गहाळ झालेले ५३ मोबाईल नागरिकांना परत

नागरिकांकडून गहाळ झालेले तसेच चोरी गेलेले मोबाईल परत मिळणे याची शाश्वती कमी असताना शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे ५३ मोबाईल परत मिळवून दिले आहेत. हे सर्व महागडे मोबाईल असून यातील अनेक मोबाईल हे इतर जिल्ह्यासह परराज्यातून मिळविले आहेत. गहाळ झालेला महागडा मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

गहाळ झालेले ५३ मोबाईल नागरिकांना परत
Pune police returned theft and lost mobile phones to the owners

शिवाजीनगर सायबर पोलिसांची कामगिरी

प्रतिनिधी, पुणे

नागरिकांकडून गहाळ झालेले तसेच चोरी गेलेले मोबाईल परत मिळणे याची शाश्वती कमी असताना शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे ५३ मोबाईल परत मिळवून दिले आहेत. हे सर्व महागडे मोबाईल असून यातील अनेक मोबाईल हे इतर जिल्ह्यासह परराज्यातून मिळविले आहेत. गहाळ झालेला महागडा मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

मोबाईल चोरी गेल्यानंतर किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल, याची शाश्वती नसते. मोबाईलमधील महत्वाचा डेटा आणि इतर माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी नागरिक तक्रार देतात. त्यानुसार मोबाइल चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील सायबर कक्षाकडे आल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव , पोलिस अंमलदार आदेश चलवादी, रुपेश वाघमारे, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबइलची माहिती संकलित करून तांत्रिक तपास सुरू केला. हरवलेले मोबाइल महाराष्ट्रातील विविध ठिकाणासह परराज्यात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मोबाईलचा आयएमईआय नंबर, लोकेशन ट्रेस करण्यासह इतर तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी साडेअकरा लाख रुपये किमतीचे ५३ मोबाइल शोधले. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल परत करण्यात आले. महागडे मोबाइल मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले आहेत.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.
--------
मोबाइल गहाळ झाल्यास तक्रार करा
मोबाइल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास नागरिकांनी पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर तसेच राज्य सरकारच्या सीईआयआर या पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.